Ad will apear here
Next
शहंशाह-ए-गज़ल


गज़लसम्राट मेहदी हसन यांचा १८ जुलै हा जन्मदिन. त्या निमित्ताने, प्रख्यात प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांचा लेख प्रसिद्ध करत आहोत.
.............
शालान्त परीक्षेचा निकाल लागून मी त्या वेळी पुण्यातल्या स. प. महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. कॉलेजकुमारांच्या मनात ज्या भावना असतात त्या घेऊनच. साल होतं १९७७. शाळेत असतानाच चित्रकला आणि संगीत हे दोन्ही माझे फिदा होण्याचे विषय. चित्रपटसंगीत जरा जास्त जवळचं. त्या वेळीही माझा आवडता संगीतकार होता ओ. पी. नय्यर; पण असे असले तरीही इतर संगीतकारांनी स्वरबद्ध केलेली तलत मेहमूदच्या मखमली आवाजातील गीतं नीरव रात्री ऐकताना एका वेगळ्याच दुनियेत गेल्याचा भास व्हायचा. तेव्हा पहिल्यांदा माझी ‘गज़ल’ या प्रकाराशी ओळख झाली. गुलाम अली यांनी गायलेल्या ‘हंगामा है क्यों बरपा, थोड़ीसी जो पी ली है’ आणि ‘कल चौदहवीं की रात थी शब भर रहा चर्चा तेरा, कुछ ने कहा ये चांद है, कुछ ने कहा चेहरा तेरा’ या गज़ला म्हणजे कॉलेजात मित्रांमध्ये कायम चर्चेचा विषय. न पिताही झिंगायला लावणारे स्वर आणि आपल्या मनातल्या ‘चांद’जवळ ही कैफियत कशी मांडावी असा प्रत्येकाच्या मनात दडून असलेला महाप्रश्न ही त्या मोरपंखी दिवसांची कमाई. बेहर, उला मिसरा, सानी मिसरा, त्यांनी बनणारा शेर, काफिया आणि रदीफ हे सगळे ज्ञान नंतरचे. हळूहळू हेही कळू लागले होते, की गज़लेची मूळ तबियत ही ‘आशिकाना’ आहे, शृंगारप्रधान आहे.

अशातच ओ. पी. नय्यर यांची एक मुलाखत वाचनात आली. त्या वेळी ते फिल्म इंडस्ट्रीबाहेर फेकले गेले होते. आणि मनःशांती ढळतीय असं वाटलं, की ते गज़लसम्राट ‘मेहदी हसन’ यांची गज़लांची रेकॉर्ड ऐकत बसत. त्यांच्याच शब्दांत सांगायचं झालं, तर ‘ओ हो हो! भगवानने क्या चीज इसके गले में रख्खी है! इसे सुनने के बाद बाकी सबकुछ फीका लगता है. जी चाहता है, कि और कुछ न सुनूँ. ही इज द लास्ट वर्ड इन म्युझिक!’

एखाद्या विषयानं झपाटून किंवा पछाडून जाण्याच्या त्या वयात मला मेहदी हसन माहीत झाले ते नय्यर साहेबांनी केलेल्या अशा जबरदस्त वर्णनातून. मग त्यांच्या गज़लेची ओळख झाली. त्याच वेळी त्यांच्या आवाजाशी ‘मैत्री’ जुळली आणि पुढे ती उत्तरोत्तर वाढतच गेली. त्यांच्या स्वर्गीय गळ्यातून पाझरणाऱ्या रवाळ, खर्जयुक्त अन् झारदार आवाजानं ‘कलामे-बेहतरीन’ अशा शेकडो गज़लांनी माझं कॉलेजजीवन फुलवून टाकलं.

शिक्षणानंतर मी प्रकाशचित्रकार म्हणून काम करू लागलो. आवडीचा विषय जेव्हा तुमचे उत्पन्नाचे साधन बनते, तेव्हा ना ते ‘काम’ राहते, ना त्याचा कधी शीण जाणवतो. माझ्या कॅमेऱ्याने तर मला इतर कामांबरोबर संगीतातील महान कलावंतांच्या सहवासात नेऊन ठेवले. कलावंतांची व्यक्तिचित्रे हा माझा आनंदाचा ठेवा झाला. जाहिरात व औद्योगिक प्रकाशचित्रणाबरोबरच मी काही मान्यवर अशा प्रकाशनांसाठीही काम करू लागलो. खासकरून विशेषांकांतील ‘फोटो-फीचर्स’

१९९४ सालची एक सकाळ. मी काही कामासाठी निघणार इतक्यात मला ज्येष्ठ पत्रकार, संपादक सदा डुंबरे यांचा फोन आला. ते म्हणाले, ‘मेहदी हसन पुण्यात आलेत. त्यांची मुलाखत घ्यायची ठरली आहे. सुलभा तेरणीकर मुलाखत घेणार आहेत. खाँसाहेबांचे काही खास फोटो काढण्यासाठी त्यांनी तासभर वेळ दिलाय. तू लगेच निघ आणि पूना क्लबवर पोहोच.’ त्यांनी फोन ठेवला. माझ्यासाठी ती सकाळ म्हणजे ‘नमूदे-सहर’ बनूनच आली. मी भराभर कॅमेराबॅग भरली. काही रंगीत फिल्म रोल, काही कृष्ण-धवल फिल्म रोल घेतले. दोन मोठे स्टुडिओ फ्लॅश, त्यांच्या सॉफ्टबॉक्स, केबल्स, ट्रायपॉड हे भरत असतानाच मनानी मी केव्हाच पूना क्लबवर पोहोचलो होतो. खाँसाहेबांच्या गज़ल मनात रुंजी घालू लागल्या. जग फिरलेला हा कलावंत आपल्याला सकाळी भेटणार आहे, त्यांच्याशी ओळख होणार आहे, नुसती ओळखच नाही तर त्यांची प्रकाशचित्रे आपल्याला टिपता येणार आहेत असे भविष्य काल मला जगातल्या कितीही मोठ्या भविष्यवेत्त्याने सांगितले असते, तरी मी त्याच्यावर विश्वास ठेवला नसता.

कसे असतील ते? त्यांचा मूड चांगला असेल ना? आपल्याला हवे तसे फोटो घेता येतील ना? त्यांना फ्लॅशलाइटचा त्रास तर होणार नाही ना? मनात येणाऱ्या गज़लच्या शब्दांबरोबरीनेच हेही प्रश्न घोळत होते. मी व माझा भाऊ हेमंत रिक्षाने लवकरात लवकर पूना क्लबवर पोहोचलो. सुलभाताईही त्याच वेळी पोहोचल्या. क्लबच्या एकमजली, जुन्या, पण टुमदार इमारतीबाहेरच आम्ही आमच्या कामाची आखणी केली. मग त्यांच्या खोलीची बेल वाजवली. एका उंच्यापुऱ्या व्यक्तीने दार उघडले. खाँसाहेब समोरच त्यांच्या बेडवर बसले होते. पांढरा कुडता आणि पायजमा असा वेश होता. समोरच त्यांच्या आवडत्या पानाचा डबा होता. एक छोटी चुणचुणीत मुलगी पलीकडे बागडत होती. ‘आईये. तश्रीफ रखिये.’ खाँसाहेबांनी हसून स्वागत केलं. अरे... या गज़लसम्राटाचा बोलण्याचा आवाजही तसाच रवाळ, खर्जयुक्त अन् झारदार आहे की... मनात लगेच विचार चमकून गेला. आम्ही आमच्या ओळखी करून दिल्या आणि स्थिरावलो.

मुलाखतीच्या आधी फोटो काढण्याचे ठरले. मी रंगीत व कृष्ण-धवल दोन्ही फोटो काढणार असल्याचे खाँसाहेबांना सांगितले. ‘जैसा आप ठीक समझे’ हे त्यांचे त्यावरचे उत्तर. मी दोन्ही कॅमेरे, फ्लॅश वगैरेची तयारी करू लागलो. हे करतानाच इलेक्ट्रिकल पॉइंटचा शोध घेतला. कोपऱ्यातला इलेक्ट्रिकल पॉइंट पाहिल्यावर मात्र माझ्या हृदयात थोडी धडधड सुरू झाली. मी त्या खोलीत इतर ठिकाणी शोध घेतला. सर्व ठिकाणी तसेच पॉइंट होते. झालं असं होतं, की क्लबची ती इमारत खूपच जुनी असल्याने तेथे जुनेच टू-पिनचे सॉकेट होते; पण माझ्या फ्लॅशला जोडणाऱ्या केबलला मात्र थ्री-पिनची सोय होती. घाईत निघताना मी एक्स्टेन्शन बोर्ड घ्यायलाही विसरलो होतो. त्या कमी प्रकाशाच्या खोलीत फ्लॅशलाइट्सशिवाय मी फोटो कसे घेणार याची चिंता माझ्या मनात निर्माण झाली. माझ्या हृदयातली धडधड आणि चिंता माझ्या चेहऱ्यावर परावर्तित झाली असणार. माझा चेहरा आणि शोधक नजरेकडे पाहत खाँसाहेबांनी मला विचारले, ‘आप कुछ ढूँढ रहे है क्या?’ मी त्यांना माझी फ्लॅश केबलची अडचण सांगितली. यावर ते म्हणाले, ‘आप ऐसा किजीये. अंदर जो रूम है वहाँ कोने में एक ‘आयरन’ रख्खी है. उस केबल का कोई युज है क्या देखिये...’ मी लगबगीने आतल्या खोलीत गेलो. तिथे कोपऱ्यात एक इस्त्री ठेवलेली होती. तिच्या केबलला एक ‘टू-पिन टू थ्री-पिन’ कनेक्टर जोडला होता. मला हायसे वाटले. तो कनेक्टर घेऊन मी परत बाहेरच्या खोलीत आलो. माझ्या चेहऱ्यावर झालेला बदल बघून खाँसाहेबांनी विचारले, ‘चलेगा आपको ये?’ मी हसून मान हलवली. ते परत म्हणाले, ‘कल आयरन करने में मुझे भी ये ही दिक्कत आई थी. इसलिये बाजार से मंगवाना पडा. पच्चीस रुपया दिजीये.’ त्यांच्या या समयोचित विनोदामुळे आम्ही सर्व जण हसू लागलो. वातावरण एकदम हलकेफुलके होऊन गेले. मी तयार आहे असे सांगितल्यावर ते म्हणाले, ‘मेरा ड्रेस तो यही रहेने दूँ ना?’ मला पांढऱ्या कुडत्याची अडचण होती; पण मी त्यांना म्हणालो, ‘आप हमेशा पेहेनते हो वह जाकीट अगर होगा तो कुछ कलर आ जायेगा’. ते उठले आणि आत जाऊन सोनेरी नक्षीकामाचे एक जाकीट घालून आले. अशा वातावरणात फोटो-सेशन उत्तम न होता तरच नवल.

मी दोन्ही कॅमेऱ्यांवर त्यांचे क्लोज-अप टिपू लागलो. त्यांच्या इतरांशी गप्पा सुरू होत्या. काही वेळातच माझ्या लक्षात आले, की हवे तसे क्लोज-अप कॅमेऱ्यात टिपले गेले आहेत. मी थोडासा थांबलो. मग धीर करून खाँसाहेबांना म्हणालो, ‘क्लोज-अप्स तो अभी मिले है, कुछ गाते हुए एक्स्प्रेशन्स मिले तो अच्छा होगा.’ ते उत्तरले, ‘भाई, अभी साज तो है नहीं.’ मी धीर करून म्हणालो, ‘अगर आप गाना शुरू करेंगे तो एक्स्प्रेशन्स तो आ ही जायेंगे.’ त्यांनी क्षणभरच विचार केला आणि म्हणाले, ‘अच्छा, क्या सुनेंगे?’ त्या क्षणीच्या माझ्या भावनांचे वर्णन करायला शब्दकोशातले सगळे शब्द अपुरे आहेत. माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले - ‘रंजिश ही सही...’

पुढची जवळजवळ आठ ते दहा मिनिटे गज़ल सरताज मेहदी हसन आम्हा पाच श्रोत्यांसाठी कोणत्याही वाद्याशिवाय ‘रंजिश ही सही...’ गायले. ही घटका अशीच बंदिस्त करता आली तर? हा प्रश्न मनात घोळवत मी मात्र फक्त त्यांच्या भावमुद्रा कॅमेराबद्ध करू शकलो. शब्द-स्वर-ताल यांचा मधुर संगम म्हणजे गज़ल. इथे त्यांचा फक्त स्वर होता तरीही तो अनुभव, तो स्वर अन् स्वर ही फक्त जगण्याची आणि हृदयात साठवण्याची चीज आहे याचा साक्षात्कार आम्हाला होत होता.

त्यानंतर आम्ही बाहेरील मोकळ्या जागेत, बागेतही काही फोटो टिपले. कॅमेऱ्याला टायमर लावून आमचा सर्वांचा ग्रुप फोटोही टिपला. चहाची फेरी झाली. त्यांनी सुलभाताईंच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. भारतरत्न लतादीदींनी म्हटले आहे, की ‘मेहदी हसन के गले में भगवान बोलते है.’ त्या वेळी आमच्याशी भगवानच तर बोलत होता की.

माझ्या ‘बझ्म-ए-गज़ल’ या कॅलेंडरच्या वेळी मला परत एकदा त्यांच्याशी पत्रव्यवहार करण्याची संधी मिळाली. नंतर मात्र ते खूप आजारी पडले. आणि १३ जून २०१२ रोजी पैगंबरवासी झाले.

त्यांनीच गायलेली एक गज़ल आहे. त्यात जणू ते स्वतःबद्दल म्हणतात, ‘शोला था जल बुझा हूँ, हवाएँ मुझे न दो, मैं कब का जा चुका हूँ सदाए मुझे न दो...’

... पण तरीही, मेहदी हसन खाँसाहेब, सगळ्या चाहत्यांच्या मनातलं एक गूज तुम्हाला सांगावंसं वाटतं, की 

गुलों में रंग भरे बादे-नौबहार चले चले भी आओ कि गुलशन का कारोबार चले 

- सतीश पाकणीकर
संपर्क : ९८२३० ३०३२०
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GYHFCO
Similar Posts
‘संतूर-नायक’ माझं मन तेहतीस वर्षं मागं गेलं. सवाई गंधर्व महोत्सव सुरू होता. मी अन् माझा कॅमेरा दोघेही ग्रीनरूममध्ये पोहोचलेलो. काहीच वेळात मी ज्यांना बघण्यासाठी तेथे आलो होतो ते पंडित शिवकुमार शर्मा तेथे पोहोचले. सहा फुटांच्या आसपास उंची. त्यांच्या काश्मिरी गोरेपणाला शोभून दिसणारा गर्द निळा झब्बा व पायजमा, लक्षात येतील इतके कुरळे केस आणि तलवार कट मिशी
न घडलेला फोटोसेशन प्रतिभावंत सिने संगीतकार सज्जाद हुसैन यांचा २१ जुलै हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, प्रख्यात प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांचा हा लेख...
‘पोएट दी प्लास्टिक्स’ ख्यातनाम प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांनी रेखाटलेले जगप्रसिद्ध डिझायनर करीम रशीद यांचे शब्दचित्र...
स्वरस्वामिनी ज्यांच्या स्वराने मनामनांवर अधिराज्य गाजवले आहे, अशा प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. त्या निमित्ताने, प्रसिद्ध प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांनी त्यांच्याबद्दल पूर्वी लिहिलेला लेख पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language